अकलूजआपला जिल्हामहाराष्ट्रविशेष

विधीसेवा फाउंडेशनच्या वतीने माळीनगरात कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा; नागरिकांना हक्क, कर्तव्ये आणि न्यायप्रक्रियेची माहिती

कायद्याची भीती नव्हे, कायद्याचे ज्ञान आत्मसात करा’

महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी| शशिकांत सरतापे |

दि. १३ सप्टेंबर २०२६. माळीनगर :

सामान्य नागरिकांना आपल्या कायदेशीर हक्कांची, कर्तव्यांची आणि संविधानिक अधिकारांची जाणीव व्हावी, तसेच अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान मिळावे, या उद्देशाने विधीसेवा फाऊंडेशनच्या वतीने माळीनगर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, रमामाता कॉलनी, माळीनगर येथे ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत विधीसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय बाबर यांनी नागरिकांना विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. फाऊंडेशनचे सचिव ॲड. सुमित सावंत यांनीही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कायदे आणि न्यायप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी एफआयआर दाखल करण्यापासून चार्जशीटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, तक्रारदाराने कोणती भूमिका बजावावी, तक्रारदारांचे कायदेशीर अधिकार, नागरिकांचे संविधानिक हक्क, कायदेविषयक जनजागृती, तसेच विधीसेवा फाऊंडेशनची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि सदस्य नोंदणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘कायद्याची भीती बाळगण्यापेक्षा कायद्याचे ज्ञान आत्मसात करा’, असा संदेश यावेळी देण्यात आला. आपल्या हक्कांची आणि कायदेशीर तरतुदींची माहिती असलेला जागरूक नागरिकच अन्यायाविरोधात योग्य आणि प्रभावीपणे आवाज उठवू शकतो. कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या वेळी घाईघाईने निर्णय न घेता योग्य वेळी कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेस ॲड. निलेश जाधव, भाई ओव्हाळ, बाळासाहेब भोसले, अनिल लोंढे, सचिन दळवी, ग्रामपंचायत सदस्या चांदणी वजाळे, अलका तावरे, स्वाती शिंदे, सुवर्णा दळवी यांच्यासह माळीनगर परिसरातील महिला, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित वजाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश कांबळे आणि यश शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीसेवा फाऊंडेशनचे सदस्य ॲड. अभिषेक चंदनशिवे यांनी केले, तर सहसचिव ॲड. गोपाळ लावंड यांनी आभार मानले. कायद्याची माहिती ही केवळ वकिलांसाठी नसून प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे, हा संदेश देणारी ही कार्यशाळा माळीनगर परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरली.

महाभारत न्युज लाईव्ह

'महाभारत न्यूज लाईव्ह' हे महाराष्ट्रातील अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. अल्प कालावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या न्यूज नेटवर्कने आपल्या निर्भीड पत्रकारिता, तळागाळातील प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती पासून ते प्रशासनाच्या दालनापर्यंत सामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्याचे कार्य महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क सातत्याने करत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्व, विकासकामे तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने जनतेसमोर मांडणे हेच महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क चे मुख्य ध्येय आहे. सत्य, न्याय, विवेक आणि जनसेवा या मूल्यांवर आधारित पत्रकारितेमुळे महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क हे आज सामान्य जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ बनले आहे. निर्भीड पत्रकारिता • जनतेचा आवाज • न्यायासाठी संघर्ष• महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | मुख्य संपादक : भारत जगताप मो. ७७२१००८८८५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button