मोठी घोषणा! आषाढी वारीत ‘व्हीआयपी दर्शन’ पूर्णपणे बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला कडक निर्देश
शासकीय विश्रामगृहात आषाढी वारी पूर्वतयारीचा उच्चस्तरीय आढावा; दोन एअर ॲम्बुलन्स तैनात, अतिरिक्त ५ कोटींचा निधी मंजूर, स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष भर


महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|पंढरपूर विशेष प्रतिनिधी: रमेश गुंड|
दि. १९ जुलै २०२६,
आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट देऊन शासकीय विश्रामगृहात उच्चस्तरीय आढावा बैठक घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
“आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि संस्कृतीचा महासोहळा आहे. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हाच आमचा खरा व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या मुख्य कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
“आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि संस्कृतीचा महासोहळा आहे. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हाच आमचा खरा व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या मुख्य कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा” -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरपावसात भीमा नदी परिसर, वाळवंट, ६५ एकर परिसर, आरोग्य सुविधा तसेच विविध विकासकामांची बोट व वाहनाद्वारे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन नियमांचे पालन करत मुखदर्शन घेतले.

बैठकीत आषाढी वारीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, नदी सुरक्षा, वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दर्शन रांग नियोजन आणि नियंत्रण कक्ष यांसह सर्व बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केली.

यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आ. तानाजी सावंत, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, राजेंद्र खरे, उत्तम जानकर, उपमुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासकीय पातळीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निन्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्व विभागांनी आपल्या तयारीचा सविस्तर अहवाल सादर केला.बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले. प्रथमच दोन एअर ॲम्बुलन्स पंढरपुरात तैनात करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका आणि औषधसाठा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पंढरपूरच्या विकासासाठी मंजूर असलेल्या ६७१ कोटी रुपयांच्या आराखड्याबरोबरच वारीतील तातडीच्या सुविधांसाठी नगरपरिषदेला अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीचा शासन निर्णय तातडीने जारी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

वारी काळात पंढरपूर शहर आणि पालखी मार्गावर २४ तास अखंडित वीजपुरवठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून महावितरणला भारनियमन पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे निर्देशही देण्यात आले.पंढरपूर मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधण्याचे निर्देश देत कोणावरही बळजबरी केली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त अधिक सक्षम करण्यात येणार असून भीमा नदी परिसरात एनडीआरएफ, एसडीआरएफ, जीवरक्षक पथके आणि विशेष बोटी तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच १५ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरात मांस, मटण आणि मासे विक्रीवर बंदी लागू राहणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देताना दर्शन रांगा, वाळवंट, भक्तीसागर, चंद्रभागा नदीपात्र आणि संपूर्ण शहरात नियमित व प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून प्रत्येक वारकरी स्वच्छ, सुरक्षित आणि समाधानकारक अनुभव घेऊन पंढरपुरातून परतला पाहिजे, यासाठी प्रशासनाने कटिबद्ध राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव आहे. प्रत्येक शासकीय विभागाने सक्रिय सहभाग, समन्वय आणि सेवाभाव जपत काम केले तर यंदाची वारी सुरक्षित, स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आदर्श ठरेल,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीच्या शेवटी केले.





