घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी.! शरीर हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत होते, पण मन मात्र माळशिरच्या जनतेच्या प्रश्नासाठी धडपडत होते!


आजारपणालाही न जुमानता जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणाऱ्या ‘कामाच्या माणसा’ची अनोखी जनसेवा
महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क| मुंबई प्रतिनिधी: प्रा. जीवन पाटील सर|
दि. ६ सप्टेंबर २०२४, मुंबई.
जनतेची सेवा ही केवळ राजकारणाचा भाग नसून, ती मनापासून जपलेली सामाजिक बांधिलकी असते. याची जिवंत प्रचिती सध्या कामाचा माणूस-आरोग्यदूत ॲड. राहुल दादा वाघमोडे-पाटील यांच्या कार्यातून येत आहे. मुंबई येथे कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व्हायरल फीव्हर व मलेरियासदृश आजारामुळे उपचार सुरू होते. असे असतानाही, रुग्णालयाच्या बेडवरूनसुद्धा त्यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली नाही. त्यांचे शरीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, मात्र मन माळशिरसच्या गावागावांत आणि आपल्या माणसांच्या अडचणींत रमले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याच्या समस्या, जळालेले डीपी, शिक्षणाच्या अडचणी, आरोग्यविषयक प्रश्न तसेच गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या अडीअडचणींबाबत फोन येताच ‘कामाचा माणूस, आरोग्यदूत’ राहुल दादांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता संबंधित अधिकारी व विभागांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला.

याचदरम्यान चव्हाणवाडी बाग येथील डी.पी. जळाल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि मुक्या जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेतीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने उभी पिके धोक्यात आली होती. ही बाब राहुल दादांच्या निदर्शनास येताच त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवरूनच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या १२ ते १३ तासांत नवीन डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाले, जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आणि ग्रामस्थांचीही मोठी अडचण दूर झाली.

“माळशिरसची मायबाप जनता हीच माझी खरी ताकद आणि माझे कुटुंब आहे. या मातीचा भूमिपुत्र म्हणून समाजकारण व जनसेवा ही माझी निस्वार्थी साधना आहे. माझे आजारपण नंतर… आधी माझ्या माणसांचा प्रश्न सुटला पाहिजे, हीच माझी भावना आहे. जनतेच्या अडचणी तत्परतेने मार्गी लावण्यातच मला समाधान मिळते. माळशिरसच्या जनतेच्या उपयोगी पडण्याचे पुण्य माझ्या हातून घडत असल्याने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि माळशिरसच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईन, असा मला विश्वास आहे.”
-कामाचा माणूस, आरोग्यदूत : ॲड. राहुल दादा वाघमोडे-पाटील

स्वतः आजारपणाच्या वेदना सहन करत असतानाही दुसऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी धाव घेण्याची ही तळमळ म्हणजेच त्यांच्या जनसेवेची खरी ओळख ठरली आहे. माळशिरसच्या जनतेशी राहुल दादांचे नाते हे केवळ राजकीय संबंधांचे नसून, सुख-दुःखात आपल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे जिव्हाळ्याचे नाते असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

नागरिकांमध्येही एकच चर्चा ऐकायला मिळत आहे, “फक्त मतांसाठी निवडणुकीच्या काळात घरोघरी फिरणारे अनेक असतात; पण आपल्या मातीतील माणसांच्या अडचणीच्या वेळी, स्वतः आजारी असतानाही धावून येणारा सामाजिक जननेता विरळच असतो!” आजारपण हे शरीराला काही काळ थांबवू शकते; मात्र जनसेवेची तळमळ असलेल्या मनाला ते थांबवू शकत नाही, हेच राहुल दादा वाघमोडे-पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. माळशिरसच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या या भूमिपुत्राच्या सेवाभावाला नागरिकांकडून मनापासून सलाम व्यक्त होत आहे.





