अकलूजआपला जिल्हागुन्हे विश्वप्रशासनमहाराष्ट्रविशेष

माळशिरस तालुक्यात एसीबीचा मोठा सापळा; ५.५० लाखांची लाच स्वीकारताना दोघे रंगेहाथ अकलूज डीवायएसपींच्या नावाने २५ लाखांची मागणी केल्याचा आरोप

अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यापासून अटकपूर्व जामिनापर्यंत लाचेची मागणी

महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | माळशिरस तालुका प्रतिनिधी : शशिकांत सरतापे

दि. २९ ऑगस्ट २०२६,

माळशिरस : अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासह काही कलमे न लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने मोठी सापळा कारवाई केली. या कारवाईत ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

लायसन्स कन्सल्टंट असलेल्या ३७ वर्षीय तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तक्रारदाराचे भाऊ व इतर व्यक्तींविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५६४/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी तसेच PC & PNDT कायद्यातील काही कलमे न लावण्यासाठी पुन्हा लाचेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. एसीबीच्या पडताळणीदरम्यान २४ ऑगस्ट रोजी आबा वळकुंदे याने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे तसेच त्यापैकी १० लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी झालेल्या पुढील पडताळणीत तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी तसेच बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी डीवायएसपी वाळके यांच्या नावाने ५ लाख रुपये आणि पोलीस हवालदार राहुल वाघ यांच्या नावाने ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या लाचेच्या मागणीस पोलीस हवालदार राहुल वाघ यांनी अपप्रेरणा दिल्याचेही तपासात समोर आल्याचे एसीबीने नमूद केले आहे. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने सापळा रचला. माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या ब्रिजखाली, जानकर प्लॉटजवळ पंचासमक्ष कारवाई करत आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात आबा वळकुंदे, महादेव माने, पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ अशा चौघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी क्रमांक १ व २ यांना २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईमुळे माळशिरस तालुक्यात पोलीस यंत्रणेशी संबंधित कथित लाचखोरीच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मोठ्या रकमेची मागणी झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. ए.सी.बी. च्या या कडक कारवाईनंतर तरी, अकलूज परिसरातील लाचखोरीची प्रकरणे व पोलीस प्रशासनाचा चालू असलेला पैसे मागण्याचा भोंगळ कारभार थांबणार का..? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कारवाईतील अधिकारी व पथक –

सापळा अधिकारी : निता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. पुणेपर्यवेक्षण : सतीश वाळके, पोलीस उपअधीक्षक,

पुणेसापळा पथक : मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे, चंद्रकांत कदम

मार्गदर्शन : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, ला.प्र.वि. पुणे.

महाभारत न्युज लाईव्ह

'महाभारत न्यूज लाईव्ह' हे महाराष्ट्रातील अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. अल्प कालावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या न्यूज नेटवर्कने आपल्या निर्भीड पत्रकारिता, तळागाळातील प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती पासून ते प्रशासनाच्या दालनापर्यंत सामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्याचे कार्य महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क सातत्याने करत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्व, विकासकामे तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने जनतेसमोर मांडणे हेच महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क चे मुख्य ध्येय आहे. सत्य, न्याय, विवेक आणि जनसेवा या मूल्यांवर आधारित पत्रकारितेमुळे महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क हे आज सामान्य जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ बनले आहे. निर्भीड पत्रकारिता • जनतेचा आवाज • न्यायासाठी संघर्ष• महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | मुख्य संपादक : भारत जगताप मो. ७७२१००८८८५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button